लातूर - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. योग्य वेळी योग्य पाऊले न उचलल्यामुळे कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय अडचणीत असताना या राष्ट्रीय आपत्तीमध्ये राज्यांना मदत करणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, राज्यांना निधीच मिळत नसेल तर देश चालवायचा कसा? असा सवाल पालकमंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात 'स्पीक इंडिया' या ऑनलाईन मोहिमेअंतर्गत पालकमंत्री अमित देशमुख हे सोशल मीडियावरून संवाद साधत होते. मुळात चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परदेशातून येणाऱ्या नागरिकांची योग्य तपासणी आणि वेळीच उपचार झाले असते, तर ही वेळ नसती. शिवाय राहुल गांधींनी याबाबत सूचना करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानेच देशातील मजूर, शेतकरी आणि इतर घटकांचे हाल झाले होते.