लातूर - धनगर समाजातील अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. केवळ धनगढ हा अस्तित्वहीन शब्द पुढे करून धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी रेणापूर येथे रास्तारोको करून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाकडून लढा उभा केला जात आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या समाजबांधवानी आंदोलन केले होते. आरक्षणाच्या अंमलबजावणी सोबत उच्च न्यायालयात एस.टी. आरक्षणासंदर्भात दाखल केलेली याचिका फास्टट्रॅक न्यायालयात घेण्यात यावी, मेंढपाळाच्या सुरक्षेतेसाठी कडक कायदे करावेत, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकरभरती करू नये, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमांना कडक शासन करण्याची मागणी यावेळी धनगर समाजबांधवानी केली.