लातूर - शहरात तहरीक-ए-इन्कलाब पार्टीच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याला (सीएए) विरोध दर्शवत मुंडन आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. तसेच मुंडनातील केस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठविण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्याविरोधात राज्यात सर्वत्र आंदोलन केले जात आहेत.
संविधान विरोधी 'सीएए' कायदा केंद्र सरकारने जनतेवर लादला आहे. त्यामुळे देशाचे संविधान धोक्यात आहे. शिवाय यामुळे धर्मभेद निर्माण होणार असल्याने त्वरित हा कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशात मोदी सरकारच्या काळात असंवैधानिक घटना घडत आहेत. आपले राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे. मात्र, सीएएमुळे धर्मभेद निर्माण होण्याचा धोका वाढू लागला आहे. या कायद्यानुसार हिंदू, शीख, जैन, बुद्धिष्ठ यांना देशाचे नागरिकत्व मिळणार, फक्त मुस्लिमांना यामधून वगळण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकार धर्मभेदाचे राजकारण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.