लातूर - निलंगा तालुक्यात विवाहितेने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्याजवळून एक सुसाइड नोटही आढळून आली आहे. ती २ महिन्यांची गर्भवती होती, सुनीता बालाजी माकणे असे या महिलेचे नाव आहे. औराद शहाजानी येथील जय भवानी नगरमध्ये ही घटना घडली.
सुनीताचा ८ महिन्यांपूर्वीच औराद शहाजानी येथील बालाजी माकणे या तरुणाबरोबर विवाह झाला होता. लग्नात मोठ्या प्रमाणात हुंडा आणि सोने देऊन लग्न करून देण्यात आले होते. मात्र, मागील ८ महिन्यांत सातत्याने आणखी हुंड्यासाठी तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच माझ्या मुलीने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, सुनीताजवळ एक सुसाइड नोट आढळून आली असून यामध्ये आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तर, ४-५ महिन्यांपासूनच्या आजाराला कंटाळून सुनिताने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्यांनी सांगितले आहे.