लातूर - जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पीक पाहणीसाठी नेत्यांची रीघ लागली आहे. मात्र, अशाच्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे औसा तालुक्यातील एका शेतकऱ्याचे दीड वर्षापूर्वी झालेले नुकसान अद्यापही भरून निघालेले नाही. मलिक इनामदार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
औसा तालुक्यातील मलिक इनामदार या शेतकऱ्याचे नुकसान झाले नुकसान आणि नेत्याच्या दौऱ्याचा काय संबंध, असे वाटणे साहजिक आहे पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेले मैदान औसा येथील मलिक इनामदार यांच्या शेतात होते. काळ्याभोर जमिनीवर 200 ट्रॅक्टर मुरूम टाकल्याने जमिनीचा दर्जा तर खलावलाच शिवाय पाणी न जिरता शेतातच साचून राहू लागले. त्यामुळे आता झालेल्या अतिवृष्टीमुळे मलिक इनामदार यांच्या शेतामध्ये टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सतत पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी तर निलंगा, औसा, औराद, शहजनी याठिकाणी अतिवृष्टी झाली. यामध्ये सोयाबीन आणि खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. औसा शहराला लागूनच असलेल्या शेतकऱ्याची वेगळीच दशा झाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान औसा येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 7 एकरातील सभा मंडपात 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला होता. सभा मंडपाची जमीन म्हणजे मलिक इनामदार यांचे शेत होते.
आता मलिक यांनी हजारो रुपये खर्च करून शेतात खत टाकले. मात्र, मुरुमाने जमिनीचा दर्जा तर खलावलाच पण जमिनीची पाणी जिरण्याची क्षमताही राहिलेली नाही. त्यामुळे शेतात पाणी साचत आहे. टोमॅटोची लागवड करण्यासाठी मलिक यांनी तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. आता पीक तयार झाले तर पावसाची अवकृपा झाली. यामध्ये निसर्गाचे संकट तर आहेच मात्र, मोदींची सभादेखील तितकीच जबाबदार आहे.
आजपासून दुष्काळ पाहणीसाठी आमदार, खासदार हे शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. मात्र, पीक पाहणीदरम्यान कुण्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.