लातूर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या 33 रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी 9 रुग्ण हे लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे येथे उपचारार्थ दाखल असलेल्या 9 रुग्णांपैकी सात रुग्ण हे अतिदक्षता विभागात असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
लातुरातील सात कोरोनाबाधित रुग्ण आयसीयूमध्ये; एकाची प्रकृती चिंताजनक
लातुरात सध्या 33 रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी 9 रुग्ण हे लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे येथे उपचारार्थ दाखल असलेल्या 9 रुग्णांपैकी सात रुग्ण हे अतिदक्षता विभागात असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
लातूरसह चाकूर, निलंगा तालुक्यात नव्याने रुग्ण आढळून आले होते. या सर्वांवर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एक रुग्ण यकृताचा व रक्ताच्या आजारामुळे दाखल झाला होता. मागील 6 महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलेल्या तापसण्यांवरून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
उर्वरित 6 रुग्णांना देखील निमोनिया असून या सर्वांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्या प्रकृतीला घेऊन जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. या सातही रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबद्दल शासकीय महाविद्यालयाला पत्रक देऊन माहिती द्यावी लागली आहे. त्यामुळे या सर्वांचीच स्थिती गंभीर आहे की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. यासंबंधी अधिकृत अहवाल आल्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे.