लातूर : जिल्ह्यातील एकट्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात बुधवारी 7 रुग्णांची भर पडली असून उदगीर शहरात आता कोरोनाचे 21 रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढत आहे.
25 एप्रिल रोजी उदगीर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि यामध्येच सदर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनतर दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून 11 दिवसांमध्ये यात 20 रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 30 झाली आहे. यातील 8 जण पूर्णपणे बरे झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला. तर, सद्यस्थितीला 21 जणांवर उपचार सुरू आहेत. उदगीर येथून तपासणीसाठी दाखल झालेले 12 व्यक्तींचे नमुने हे प्रलंबित होते. बुधवारी रात्री 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 7 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह, एकाचा निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल हे अनिर्णित आहेत.
जिल्ह्यात केवळ उदगीर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. अधिकतर रुग्ण हे मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कातील आहेत. मात्र, दिवसेंदिवस शहराला विळखा घातला जात असल्याने उदगीरमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 13 मे पर्यंत शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता यामध्ये वाढ केली जाणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नागरिकांना अत्यावश्यक सुविधा ह्या घरपोच दिल्या जात आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असतानाही शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे हे विशेष.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती -
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निलंगा येथे दाखल झालेल्या 12 परप्रांतीयांपैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 14 दिवसानंतर या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर, 25 एप्रिल रोजी उदगीर येथे 70 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. यामध्येच तिचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर नवे 21 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 30 आहे. यापैकी 8 जण उपचारानंतर बरे झाले, एकाचा मृत्यू तर 21 जणांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.