लातूर -जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा या गावात राहणाऱ्या २५ वर्षे वयाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजीव काशिनाथ दुधभाते असे या तरुणाचे नाव आहे. काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे मोठे पाऊल उचलल्याचे समजते.
हा तरुण पुण्यामध्ये काम करीत होता. लॉकडाऊनमुळे तो गावी परतला होता. गावात काम मिळत नसल्यामुळे तो दारुच्या नशेच्या आहारी गेला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,वडील काशिनाथ रानबा दुधभाते यांच्या फिर्यादी वरून त्यांचा मुलगा रात्री दारु पिऊन आला होता. तो पूर्णपणे नशेत होता. घरातील महिला जेष्ठा गौरी आगमनाची तयारी करत होत्या. रात्री तो उशिरा आला व झोपायला म्हणून खोलीत गेला व मध्यरात्री त्याने गळफास लावून स्वतःला संपविले.
बीट जमादार प्रकाश रामशेट्टे व डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा येथे पाठवून दिले. तिथे डॉ. माधव भंडारे यांनी शवविच्छेदन केले व प्रेत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
संजीव दुधभाते यांचे गेल्यावर्षीच लग्न झाले असून तो पुणे येथे इलेक्ट्रिक काम करत होता. अनेक वर्षे तो पुण्यात वास्तव्यास होता. कोरोनाच्या संक्रमणानंतर तो गावी परतला आणि गेली चार पाच महिने तो इथेच राहात होता.गावात केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळत नसल्याने व संसाराचा गाडा चालवावा कसा या नैराश्यतून आत्महत्या केल्याचे मयताच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले आहे. मयताच्या वडीलांच्या सांगण्यावरून औराद शहाजानी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.