लातूर - लावणी महोत्सव असो की कला क्षेत्रातील कोणताही कार्यक्रम याकडे केवळ एक करमणूक म्हणून पाहिले जाते. परंतु, लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी सुरू झालेली लावणी तब्बल 24 तासानंतर थांबली. 15 वर्षीय सृष्टी जगताप हिने हा अनोखा उपक्रम करून आशिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद केली आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता तिच्या या नृत्याला सुरवात झाली होती. अनेकांना वाटत होते की एवढ्या कमी वयात सृष्टीला हे शक्य होईल का ? मात्र, तिने हे करून दाखवले आहे. शिवाय रेकॉर्ड केल्यानंतर लातूरकरांचे आभारही मानले आहेत.
सलग 24 तास लावणीवर नृत्य सादर
सृष्टी सुधीर जगताप हिला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिचा छंद जोपासला तो आई-वडील आणि आजोबांनी. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या स्पर्धेत भाग नोंदवून 72 पारितोषिके मिळवली आहेत. शिवाय लॉकडाऊनच्या काळात मनात आलेला विचार तिने या उपक्रमाच्या माध्यमातून साकार केला आहे. अनेक प्रकारचे महोत्सव आयोजित केले जातात पण लावणीमध्ये कोणताही रेकॉर्ड नाही. त्यामुळे यामध्येच वेगळे काहितरी करण्याच्या उद्देशाने सलग 24 तास लावणीवर नृत्य सादर करण्याचा निर्धार केला. याकरिता गेल्या सहा महिन्यांपासून सृष्टी आणि तिचे कुटुंबीय अविरत परिश्रम घेत होते. 26 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता सुरू झालेला हा तिच्या नृत्याचा प्रवास 27 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजताच संपला. दिल्लीहुन आलेल्या मार्गदर्शक यांच्यासमोर तिने हे नृत्य सादर केले. 24 तासात 700 लावण्यावर तिने नृत्य केले होते. एवढ्या कमी वयात हे शक्य होईल असे कुणालाच वाटत नव्हते. केवळ सृष्टी आणि तिच्या पालकांना याचा विश्वास होता.
आजोबांना आनंदाश्रू अनावर
सृष्टीला या स्पर्धेत यश मिळावे तसेच लहानपणापासून तिचा सराव व्हावा याकरिता आजोबा बबन माने यांनी अविरत परिश्रम घेतले आहे. किल्लारी- लातूर असा प्रवास त्यांनी सृष्टीसोबत केला होता. शिवाय या उपक्रमादरम्यान तिची काळजीही आजोबा बबन माने यांनी घेतले. गेल्या 24 तासात डोळ्याची पापणी लवू न देता त्यांनी सृष्टीचे परिश्रम पाहिले होते. अखेर तिने हे रेकॉर्ड पूर्ण करताच त्यांना अश्रू अनावर झाले होते.