लातूर -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगावात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. लातूर येथील किराणा दुकानात कामाला असलेल्या बाभळगावातील एकाला कोरोनाची लागण झाली होती, तर त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलालाही कोरोना झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या गावातील राजा भगीरथनगर हा भाग कंटेनमेंट करण्यात आला आहे.
पालकमंत्री अमित देशमुखांच्या बाभळगावातच 2 जणांना कोरोनाची लागण - बाभळगाव कोरोनाचे रुग्ण
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगावात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. लातूर येथील किराणा दुकानात कामाला असलेल्या बाभळगावातील एकाला कोरोनाची लागण झाली होती, तर त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलालाही कोरोना झाला आहे.
लातूर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 175 वर गेली आहे. त्यापैकी 36 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला. 131 रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनलॉक 2 सुरू झाल्यापासून नियमात शिथिलता आली आहे. तर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे दिवसाकाठी 6 ते 7 रुग्णांची भर पडत आहे. बाभळगाव येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर कंटेनमेंट झोनच्या परिसरात आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी तैनात आहेत. या भागात 17 कुटुंब आणि 67 नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे बाप-लेक कुणाच्या संपर्कात आले आहेत याचा शोध सुरू आहे.
दोन दिवसांपासून हा भाग सील करण्यात आला असून, या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरवली जात आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह सर्व देशमुख कुटुंबीय हे बाभळगावातील घरीच वास्तव्यास आहेत.