लातूर- जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा चढता आलेख लॉकडाऊनमध्येही कायम राहिला आहे. शनिवारी तब्बल 188 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन अंकाने वाढत होती. पण गेल्या चार दिवसांपासून शंभरच्या घरात वाढ होत आहे. शनिवारी तर सर्वधिक 188 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 हजार 311 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी 482 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पैकी 119 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 392 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 69 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या 15 दिवसात जिल्ह्यात लॉकडाऊन होता तर सध्या लातूर शहर हद्दीत कायम आहे. असे असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या तर वाढत आहेच शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी एकाच दिवशी 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या शंभरीवर गेली आहे.
रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी झपाट्याने होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत 1 हजार 284 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 927 जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णाच्या निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असले तरी दिवसाकाठी होत असलेली वाढ ही चिंतेची बाब आहे.