लातूर - चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे 13 दिवसाच्या चिमुरडीला चक्क पाण्याच्या ड्रममध्ये टाकून मारल्याची घटना घडली आहे. दुर्दैव म्हणजे मुलीच्या मामानेच सारखी रडतेस का म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
चाकूर तालुक्यातील हुगडेवाडी येथील महिला ही बाळंतपणासाठी झरी बुद्रुक येथे माहेरी आली होती. तेरा दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला. शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) सकाळपासून ही चिमुरडी घरात दिसत नव्हती. कुटुंबातील सदस्यांनी मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, घरालगतच असलेल्या एका पाण्याच्या टाकीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक अवस्थेत चाकूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या घटनेची उकल केली असता चिमुरडीचा मामा कृष्णा अंकुश शिंदे (वय 20 वर्षे) यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या सततच्या रडण्याने त्याची रात्री झोपमोड होत होती. या क्षुल्लक कारणावरून त्याने हे कृत्य केले आहे. चिमुरडीच्या मामाचे नाव कृष्णा असले तरी त्याने कंसासारखे कृत्य केले आहे.
उपविभाग पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. मात्र, तपासाअंती हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृष्णा शिंदे विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चाकूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
हेही वााच -शिवलिंग शिवाचार्य महाराज खरंच समाधी घेणार होते का? एक ना अनेक प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...