लातूर - शाळा सुटल्यानंतर बोरं काढण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना औसा शहरातील बँक कॉलनी परिसरात घडली आहे. तब्बल २४ तासानंतर या मुलाचा शोध लागला आहे.
बोरं काढण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू - Latur Crime News
प्रथमेश प्रदिप खंदाडे या ११ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या आधी सुध्दा पाच ते सात जणांनांचा या विहिरीत पडल्याने जीव गेला होता.
प्रथमेश प्रदिप खंदाडे हा अकरा वर्षीय मुलगा बँक कॉलनीत वास्तव्यास होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर कॉलनी जवळ असलेल्या बोराच्या झाडावर बोरे काढण्यासाठी चढला. मात्र, त्याचा तोल गेला आणि बोरिखालीच असलेल्या ४० फुटी जुन्या विहिरीत पडला. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत तो घरी परतालाच नसल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री अंधार पडल्याने नातेवाईकांच्या काही लक्षात आले नाही. शुक्रवारी दिवस उजडताच त्याच्या शोधकार्याला सुरुवात झाली. दरम्यान, कॉलनीत असलेल्या विहिरीतच तो पडला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. विहिरीतील पाणी उपसले असता प्रथमेशचा मृतदेह आढळला. या घटनेने शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. औसा पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीसुद्धा याच विहिरीमध्ये किमान पाच ते सात जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती असलेल्या या भागातील विहिरी भोवती संरक्षक कठडा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.