लातुर-लातूर महानगरपालिका परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्या 11 रुग्णांची भर पडली असून यापैकी 4 रुग्ण हे शहरातील आहेत. शिवाय हे सर्व रुग्ण उपचार घेत असलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत.
रविवारी जिल्ह्यातून 110 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. यामधील 93 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. 6 व्यक्तींचे अहवाल हे अद्यापही अनिर्णित आहेत.
शहरातील एमआयडीसी परिसरातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. आता याच मुलीच्या कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
उदगीर उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत 51 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी दाखल झाले होते. यापैकी 5 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत तर दोघांचे अनिर्णित आहेत. अहमदपूर येथील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. याच बरोबर निलंगा, कासार शिरशी येथील सर्व अहवाल हे निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ही 96 वर पोहोचली. 56 जणांवर उपचार सुरू असून 37 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर तिघांचा मृत्यू झालाय. वाढती रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असून एमआयडीसी परिसरात विशेष सतर्कता बाळगली जात आहे. उदगीर प्रमाणेच लातूर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत आहे.