कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावात युवराज घोरपडे हे राहतात. त्यांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांपाठोपाठ आईचेही निधन झाले. आई-वडिलांविना पोरके झालेल्या युवराज घोरपडे यांच्यावर त्यांच्या तीन बहिणींसह घराची आणि शेतीची जबाबदारी आली. त्याचवेळी युवराज घोरपडे यांच्या आईने त्यांच्या बहिनीकडून म्हणजेच जयश्री क्षीरसागर यांच्याकडून आपल्या मुलांचा सांभाळ करण्याचे वचन घेतले. आपल्या बहिणीला दिलेले वचन जयश्री क्षीरसागर यांनी आजपर्यंत पेलले आहे. त्यांनी घोरपडे भावंडांना आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे माया केली. त्यांच्या या मायेची काहीही केले तरी परतफेड होणार नाही. मात्र, त्यांना काहीतरी भेट नक्कीच देता येईल, असा विचार करून युवराज घोरपडे यांनी मावशीसाठी चांदीची चप्पल तयार करून घेतली आहे.
श्रीमंतीचा गर्व नाही, ही तर मायेची भेट -
आई गेल्यापासून आजपर्यंत मावशीने कधीही आईची कमी भासू दिली नाही. आम्हा भावंडांना जे हवे ते दिले. तिचा आधारच आजपर्यंत आमच्यासाठी खूप काही होता. त्याची परतफेड तर कधी करूच शकत नाही. मात्र, तिला आम्ही प्रेम देऊ शकतो. म्हणूनच तिच्या जन्मदिनी दिला चांदीची चप्पल देण्याचे ठरवले. आज माझ्याकडे जे काही आहे ते तिच्या आशीर्वादाने मिळाल्याचे युवराज घोरपडे यांनी सांगितले.