कोल्हापूर -अनेक तरुणांना इतिहासाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची गोडी निर्माण झाली आहे. अनेक घटनांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याने आपणच स्वतःहून इतिहास जाणून घेण्याची इच्छा अनेक तरुणांची आहे. त्यासाठी मोडी लिपी अवगत असणे आवश्यक असल्याने मोडी लिपी शिकण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत.
बाराव्या शकतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. मात्र, आता याच मोडी लिपीची गोडी पुन्हा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाइन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली, असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत या लिपीचे जनक होते. यादव काळापासून सुरू झालेला मोडीचा हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनातही होत असे. 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत मोडी लिपी होती. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये 1960 पर्यंत मोडी शिकवली जाई. मात्र, छपाईच्यादृष्टीने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात मोडी लिपी नाहीशी झाली.
मोडी लिपीचा सर्वात जास्त प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत. अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते याचा 3 डिसेंबर 2003 रोजी शुभारंभ झाला.
मोडी लिपी शिकण्यासाठी काय करावे?