कोल्हापूर Year Ender 2023 :मागील वर्षभरात कोल्हापूरमध्ये अनेक घडामोडी घडल्या. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केल्याचं प्रकरण राज्यभर गाजलं. यासह कोल्हापूर शहरात दंगल घडल्यानं राज्यभर या प्रकरणानं वातावरण ढवळून निघालं. विविध कारणानं या वर्षी कोल्हापूर राज्यभर चर्चेत राहिलं. याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूरमध्ये घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांवर एक नजर टाकूया.
हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा : 11 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 'कागल' मधील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास ईडीचा छापा पडला. तब्बल 26 अधिकाऱ्यांचं पथक मुश्रीफांच्या घरात दाखल झालं आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. यामुळं कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर ईडीकडून त्यांच्या घरावर छापेमारी करत कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा 1 फेब्रुवारीला हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीनं छापा टाकला होता. हा छापा तब्बल दोन दिवस चालला, यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर पुन्हा 11 मार्च रोजी ईडीनं हसन मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापेमारी केली होती.
कोल्हापूर बंगळुरु विमानसेवेसह कोल्हापूरहून 20 शहरांना कनेक्टिंग विमान सेवा सुरू :कोल्हापूरहून मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद या ठिकाणी विमान सेवा सुरू होती. मात्र केंद्र सरकारनं जानेवारीमध्ये कोल्हापूर बंगळुरू विमानसेवेसह कोल्हापूरहून 20 शहरांना कनेक्टिंग विमानसेवा सुरू केली. इंडिगो कंपनीकडून ही विमान सेवा सुरू करण्यात आली होती. कोल्हापूरहून बंगळुरूला जाणारं विमान सुरू झालं. पुढं दक्षिण भारतातील कोइम्बतूर आणि दक्षिणेमध्ये भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोलकाता ,लखनऊ यासह वीस शहरांना कनेक्ट होत असल्यानं शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी जाणाऱ्यांसाठी हे मोठं फायद्याचं ठरलं.
रस्त्यातील खड्ड्यामुळे हादरे बसून रस्त्यातच प्रसूती : कोल्हापूरचे रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. मार्च महिन्यामध्ये या खड्ड्यांमुळे एका गर्भवती महिलेला हादरे बसून कळ येण्यास सुरुवात झाली. आणि तिची रस्त्यातच प्रसूती झाली. ही घटना निपाणी मुरगुड रोडवरील यमके गावाजवळ घडली होती. सदर कुटुंब हे मध्य प्रदेशातून ऊस तोडणी कामगार म्हणून कोल्हापुरात आले होते. ऊस तोडणीसाठी जात असताना रस्त्यातच अचानक हा प्रसंग घडला. दरम्यान रुग्णवाहिका मागवण्यात आली होती. मात्र खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका येण्यास विलंब झाला आणि सदर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. कोणतीही वैद्यकीय यंत्रणा तिथे उपलब्ध नसल्याने अक्षरशः बाळाची नाळ हे खुरप्यानं कापावे लागली होती. या घटनेनंतर प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली होती.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक :या वर्षातील सर्वात चर्चेचा विषय ठरला, तो छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक. या साखर कारखान्यात गेल्या 30 वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता होती, याला उलटवून लावण्यासाठी सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. मात्र सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या पॅनलच्या 29 उमेदवारांचे अर्ज हे निवडणूक अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर जोरदार टीका करत "सत्तेचा दुरुपयोग करत महाडिक यांनी उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवले" असा आरोप केला. मात्र तरी देखील महाडिक गटाला पुन्हा या कारखान्यावर 21-0 ने एक हाती सत्ता मिळवण्यात यश आलं.
इचलकरंजीला मिळाली नवी ओळख :25 मे रोजी इचलकरंजी शहराला एक नवीन ओळख मिळाली. 'मँचेस्टर नगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीला नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आणि MH 51 हा नंबर देण्यात आला. इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील मिळाल्यानं इचलकरंजी मधील नागरिकांकडून जल्लोष करण्यात आला होता. तर लवकरच इचलकरंजी हातकणंगले आणि शिरोळ या भागातील लोकांसाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक उभा करण्यात येईल असे आमदार प्रकाश आवाडे म्हणाले होते. यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला आता दोन नंबर मिळाले असून MH 09 आणि इचलकरंजी शहराला MH 51 असे नंबर आता देण्यात येत आहेत.
ऊस आंदोलन यशस्वी :22 व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी 22 दिवस 522 किलोमीटर चालत आत्मक्लेष पदयात्रा आंदोलन केले. गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी हे आत्मक्लेष पदयात्रा आंदोलन केले. मात्र सरकार आणि साखर कारखानदारांनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात आले. 7 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी यंदाच्या उसाला एक रकमी 3500 उचल मिळावी अशी मागणी केली. यानंतर राजू शेट्टी यांच्या साखर कारखानदार आणि सरकारसोबत तीन बैठका पार पडल्या. मात्र या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्यानं आक्रमक झालेले राजू शेट्टी यांनी महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला. आणि त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी राजू शेट्टी यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग शिरोली येथे दिवसभर अडवून धरला. तब्बल आठ तासानंतर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी दोघेही एक एक पाऊल मागे येत सुवर्णमध्य काढला आणि मागणी मान्य झाल्याने आंदोलन थांबवण्यात आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठ यश मिळालं.
हेही वाचा -
- मुख्यमंत्री पदाच्या हुलकावणीनंतरही देवेंद्र फडणवीस राज्यात ठरले सर्वाधिक वजनदार नेते, नव्या वर्षात काय असणार आव्हाने?
- महाराष्ट्र संदर्भातील वर्षभरातल्या महत्त्वाच्या न्यायालयीन घडामोडींचा आढावा
- Year Ender २०२३ : महायुती सरकारचे 2023 मधील 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय