कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंत जगभरात विविध आकारांमध्ये आणि विविध प्रकारे चित्र साकारल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, कोल्हापुरातील एका कलाकाराने चक्क 'तिळावर' चित्र काढण्याची किमया साधली आहे. अशांत मोरे असे या कलाकाराचे नाव असून महाराजांचे हे जगातील सर्वात छोटे चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही मोरे यांनी अनेक छोटी चित्र काढली आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी तिळावर सुंदर असे चित्र साकारले आहे आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे शक्य झाले आहे.
मायक्रो आर्टिस्ट म्हणून त्यांनी कोल्हापुरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. ते सर्प आणि प्राणी-पक्षी प्रेमीसुद्धा आहेत. सध्या ते कला शिक्षक म्हणून एका खाजगी शाळेत काम करतात. त्यांना अशाच विविध कलाकृती करण्याचा छंद आहे. त्यांनी या छंदामधूनच आत्तापर्यंत जवळपास 20 ते 25 मायक्रो आर्टद्वारे छोट्यात छोटी चित्रे काढली आहे. यामध्ये छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, स्वामी समर्थ महाराज, दादा कोंडके, अण्णाभाऊ साठे, शरद पवार अशा अनेकांचे समावेश आहे. पेंन्सिलच्या लीडवर सुद्धा त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच यांनी तांदळावर चित्र साकारले होते. त्यानंतर झालेल्या अनेक गौरवांची ऊर्जा घेत आता त्यांनी तिळावर चित्र साकारले आहे.