कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु तलाव फुटल्याची घटना घडली आहे. बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन नवले गावातील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर काहीजणांना बचावण्यात यश आले आहे. दरम्यान, या फुटलेल्या तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
भुदरगड तालुक्यातील मेघोळी तलाव फुटला; महिलेचा मृत्यू, जनावरे दगावली-
या दुर्घटनेत नवले गावातील जिजाबाई मोहिते (वय 55) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोड्यक्यात बचावले आहेत. शिवाय शेजारीच असलेल्या निवृत्ती मोहिते यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांची चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ओढ्यालगत असणाऱ्या काहींच्या घराशेजारी लावलेल्या मोटारसायकल सुद्धा वाहून गेल्या असून शेतीची मात्र मोठे नुकसान झाले आहे.
झोपेत असणारे अनेकजण तलाव फुटल्याची बातमी समजताच खडबडून जागे -
मेघोळी प्रकल्प फुटल्याने अनेकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ही बातमी समजताच परिसरतील मेघोली, सोनूर्ली, नवले, वेंगुरूळ, ममदापूर आदी गावातील नागरिक झोपेतून खडबडून जागे झाले. अनेकांनी तलावाचे पाणी पसरलेल्या भागापासून सुरक्षित स्थळी धाव घेतली. तर या तलावातील पाण्यामुळे गावातील ओढ्यां नाल्यांना पूर आल्याचे पाहण्यासाठी नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
भुदरगड तालुक्यातील मेघोळी तलाव फुटला; कोल्हापूर जिल्ह्याला नुकताच पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्यानंतर आता ही तलाव फुटल्याची घटना घडल्याने मेघोली परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या तलाव्याच्या पाण्यामुळे नागरिकांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तलाव फुटीची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळीव वास्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.