कोल्हापूर/ नाशिक -राज्यात कोरोनामुळे आरोग्यसेवा कोलमडून पडली असताना राज्याची मान शरमेने खाली घालणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत.कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्हच्या या वादात गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने महिलेची रुग्णालयासमोरील रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे घडली आहे. दुसऱ्या घटनेत नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने एका महिलेची प्रसूती गुरुवारी (3 सप्टेंबर) रस्त्यावरच झाली होती. त्यानतंर त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या महिलेला व तिच्या बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना चाचणी दिलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने महिलेची रुग्णालयासमोरील रस्त्यावरच प्रसूती झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबधित महिलेला दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयांनी नकार दिल्याने महिलेची आजरा येथील एका रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील अनेक रुग्णालयांनी सुद्धा महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे पुन्हा आजरा तालुक्यातील रुग्णालयात मध्ये गेले असता तिथेही दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण प्रकार घडला असून महिला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या वादा दरम्यान महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे समोर आले आहे.