कोल्हापूर- ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन आज पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. मारेकरी आजही मोकाट आहेत. तसेच गुन्ह्यातील शस्त्रांसह वाहनांचासुद्धा सुगावा तपास यंत्रणेला लागला नाही. त्यामुळे, तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले. जोपर्यंत हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत लढा देत रस्त्यावर उतरत राहू, असा इशारा ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी दिला.
मॉर्निंग वॉकदरम्यान 'गोविंद पानसरे अमर रहे', अश्या घोषणा देत तपास यंत्रणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला, तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. आज या घटनेला पाच वर्षं पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा तपास यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त होत आहे.