कोल्हापूर- भाजपने केलेले दुर्लक्ष आणि राजकारणातील आपले महत्व कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा स्वाभिमानिशी हातमिळवणी करण्याची भाषा सदाभाऊं खोत यांनी केली. मात्र, राजू शेट्टी यांच्या प्रतिक्रियेमुळे सदाभाऊंचे सर्वच डावपेच हाणून पडले. यातून सदाभाऊंनी काय साध्य केले, याचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत-
राजकारणात कोणीही एकमेकांचा कायमचा शत्रू किंव्हा मित्र नसतो. शेतकऱ्यांंच्या प्रश्नांवरती राजू शेट्टी आणि आमची भूमिका एक आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र येऊ, असे संकेत खोत यांनी दिले होते. आज राजू शेट्टी आणि माझ्यात जी दरी आहे. ती राजकीय पटलावर कोणाची बाजू घ्यायची यावरून निर्माण झाली आहे. पण राजू शेट्टींनी प्रस्थापितांची संगत सोडून जर विस्थापितांची बाजू घेत, साखर सम्राटांच्या विरोधात सर्व सामान्यांच्या बाजूने लढा हातात घेतल्यास सदाभाऊ खोत शेट्टींना पुन्हा खांद्यावर घ्यायला तयार आहे, अशी साद खोत यांनी शेट्टींना घातली होती.
सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया काय म्हणाले राजू शेट्टी-
स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या लोकांनाच स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळ करते. ज्यांना समिती नेमून पक्षातून हाकलून लावले, त्यांना पुन्हा संघटनेत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ यांच्याकडे स्वच्छ चारित्र्यही नाही आणि स्वच्छ हातही नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया सदभाऊंचा शेट्टीवर पलटवार-
राजू शेट्टी यांच्या टिकेनंतर सदाभाऊ खोत यांनीही शेट्टींवर सडकून टीका केली. 2013 साली दिवाळीच्या पाडव्या दिवशी ऊस आंदोलनात शेतकऱ्यांची दोन तरुण मुले शहीद झाली होती. ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या त्यांच्या अंगणात आमदाराकीसाठी लोटांगण घालत गेले. पण त्यांना तिथे एखादया निर्वासिताप्रमाणे वागणूक दिली जाते, अशी टिकाही खोत यांनी केली. राजू शेट्टी यांचे हात स्वछ आहेत, हे मला माहित आहे. पण हेच हात याआधी सदाभाऊ खोत यांच्या हातात होते. त्यावेळी तुम्ही रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत होता काय आणि आता रोज गोमूत्राने आंघोळ करता काय, हे आधी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
राजू शेट्टींच्या प्रतिक्रियेमुळे काय झाले-
गेल्या पाच वर्षांपूर्वी सदाभाऊंनी भाजपसोबत चूल मांडली होती. मात्र, सत्ता नसताना सदाभाऊ खोत यांना आपल्या राजकारणातील अस्तित्वाची जाणीव झाल्याने ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्याशी स्नेहबंध जुळवून घेण्याची भाषा करू लागले. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत येऊन आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्याशिवाय भाजपवर दबाव टाकत आणखीन एखादे पद किंवा राजकारणातील महत्त्वाचे स्थान पदरात पाडून घेण्याची धडपड होती. मात्र, सदाभाऊंच्या या चालीच्या उलट चाल करत राजू शेट्टी यांनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन सदाभाऊची हवा काढून घेतली. पुणे पदवीधर मतदारसंघावरून झालेल्या राजकारणामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा जुन्या मित्राची आठवण झाली असली, तरी शेट्टी हे कोणत्याही मनस्थितीत पुन्हा सदाभाऊंशी गट्टी नको, याच स्थितीत आहेत. त्यामुळे राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर भाजपाला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता, हे सदाभाऊंना ध्यानात आले. त्यामुळे त्यांच्यावर पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेचा उमेदवाराला माघार घेण्याची वेळ आली.
भाजपचा सदाभाऊंच्याकडे कानाडोळा-
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सदाभाऊंना विचारात घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी अनेकांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे सदाभाऊंबद्दल भाजपच्या गोटात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या समर्थनार्थ प्रचार आणि प्रसारासाठी प्रभावी वातावरण सदाभाऊ खोत तयार करू शकले नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातच टिपणी केल्याबद्दल भाजपच्या एका गटाची नाराजी ओढवून घेतली. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून महाविकास आघाडीने राज्यात बंदी घातली. त्यावेळी देखील महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करू शकले नसल्याचे भाजपचे गोटात चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप सदाभाऊंकडे कानाडोळा करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी काम करावे-
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बारकाईने जाणीव आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी पुढे येऊन काम करावे, असे मत देखील राजकीय विश्लेषक दयानंद लिपारे व्यक्त केले आहे. उसाची एफआरपी, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले.
दयानंद लिपारे यांची प्रतिक्रिया सदाभाऊंनी काय साध्य केले-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी नाळ तुटल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. त्याचबरोबर भाजपशी हातमिळवणी करीत सत्तेची ऊब घेतली. कृषी राज्यमंत्री पद पदरात पाडून पाच वर्ष सत्ता भोगली. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे सदाभाऊंना पुन्हा आपल्या राजकारणातील अस्तित्व जाणवू लागल्याने, भाजपला घरचा आहेर देत व नमती भूमिका घेत पुन्हा एकदा मित्राच्या म्हणजेच राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. सदाभाऊंनी घेतलेली नमती भूमिका मात्र राजू शेट्टी यांना मान्य झाली नाही. उलट राजू शेट्टी यांनी गद्दारांशी पुन्हा मैत्री नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून भाजपला इशारा देऊन सदाभाऊ खोत यांना भाजपच्या गोटात आपले महत्त्व अधिक करण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या. मात्र, राजू शेट्टींच्या या प्रतिक्रियेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील परतीचे दोर कधीच कापले असल्याचे लक्षात येताच सदाभाऊ खोत पुन्हा एकदा भाजपला शरण गेले. त्यामुळे सदाभाऊंनी व्यक्त केलेली इच्छा ही फक्त केवळ चर्चाच राहिली.