कोल्हापूर- एकीकडे हंडाभर पाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक शेकडो पाऊले चालत जाऊन दूषित पाणी सुद्धा पिण्यासाठी वापरत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेकडो लिटर पाणी जमिनीवर मारण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या एका सुज्ञ नागरिकाने हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आहे.
Exclusive : एकीकडे पाण्यासाठी वणवण, दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेकडो लिटर पाण्याची नासाडी - कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मात्र महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधून शेकडो लिटर पाणी हे फक्त जिल्हाधिकार्यालयाच्या आवारातील रस्ते थंड करण्यासाठी वापरले गेले. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दुरपर्यंत चालत जावे लागते.
सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात इतका पाऊस पडतो कि, या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पावसाळ्यात ओसंडून वाहतात. अनेकदा जिल्ह्यातील नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे चित्र असते. पण सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. तर काही ठिकाणचे पाण्याचे स्रोत पूर्णतः बंद झाल्याचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक वाड्या-वस्त्यांना आजही शेकडो पावले चालत जाऊन पिण्यास अयोग्य असणारे पाणी देखील प्यावे लागते.
विशेष म्हणजे एक हंडा भरण्यासाठी तासन् तास थांबावे लागते. तर काही महिला स्वतः विहिरीत उतरून आपला जीव धोक्यात घालून वाटीने पाणी हंड्यात भरतात. पाणीदार जिल्हा असणाऱ्या कोल्हापुरातील हे विदारक चित्र असताना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मात्र महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधून शेकडो लिटर पाणी हे फक्त जिल्हाधिकार्यालयाच्या आवारातील रस्ते थंड करण्यासाठी वापरले गेले. जिल्हा प्रशासनाने हे रस्ते थंड करण्यासाठी पाणी का वापरले? त्यामागचं गमक काय? आणि या शेकडो लिटर पाण्याची कुणाच्या परवानगीने नासाडी करण्यात आली हे प्रश्न सामान्य कोल्हापूरकर प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.