कोल्हापूर -जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुद्धा पाण्याची पातळी वाढत आहे. सध्या धरणामध्ये 66.43 दलघमी पाणीसाठा आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या पाण्याची पातळी 25 फुटांवर पोहोचली असून 26 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 2 वाहतूक मार्ग बंद झाले आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज, वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत.