कोल्हापूर- शहरातील लोणार वसाहत परिसरात मागील २ महिन्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी आज महापालिका विरोधात हंडा मोर्चा काढत रास्ता रोको केला. या भागात अत्यंत अत्यल्प प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप महिलांनी केला. या रास्ता रोकोत महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाण्यासाठी महिलांचा कोल्हापुरात हंडा मोर्चा, घोषणाबाजीसह रास्ता रोको - महिला
शहरातील लोणार वसाहत परिसरात मागील २ महिन्यापासून व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी आज महापालिका विरोधात हंडा मोर्चा काढत रास्ता रोको केला.
लोणार वसाहत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी अनेक निवेदने दिली. मात्र, महापालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे अखेर संतापलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन कावळा नाका परिसरातील ताराराणी पुतळ्यासमोर रास्ता रोको केला. सुमारे तासभर हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
जवळपास २०० हून अधिक महिलांनी आपल्या हातात हंडा घेऊन तो वाजवत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे ताराराणी चौक परिसरातील वाहतूक कोलमडली होती. आंदोलन सुरू झाल्याचे समजताच काही वेळात महापालिकेच्या पाणीपुरवठाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. मात्र, त्यांना देखील या महिलांच्या आंदोलनाचा रोष पत्करावा लागला. लोणार वसाहत परिसरातील पाण्याची तांत्रिक अडचण दूर करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करू असे, आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी आंदोलन मागे घेतले.