कोल्हापूर- जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याही प्रकारचा फटका बसणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहतील, असे नियोजन सुद्धा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत महापूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. शिवाय महापूर स्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांच्या हक्काचे पाणी आहे. त्याहूनही अधिक पाणी महापुरामुळे वाया जाते. राज्याच्या एका भागात महापूर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा अशी विसंगत स्थिती निर्माण झाल्याचे दिसते. हे चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्यासाठी जागतिक बँकेचे २३ तज्ज्ञांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. त्यातून अशा प्रकारच्या योजनेचे नियोजन केले जाईल की वीज, पाणी पुरवठा, रस्ते, पूल हे महापूर काळातही बंद न पडता सुरू राहतील.