कोल्हापूर - गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून, पंचगंगा नदीनेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 44.10 फूट इतकी झाली असून, धोका पातळीपेक्षा दोन फूट पाणी जास्त आहे. काल रात्री (गुरुवार) राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलीत दरवाजे उघडले असून, त्यातून 7 हजार क्यूसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
पुन्हा महापुराचा धोका; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पाणी 45 फुटांवर - कोल्हापूर पंचगंगा नदी न्यूज
पाच दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून, पंचगंगा नदीनेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 44.10 फूट इतकी झाली असून, धोका पातळीपेक्षा दोन फूट पाणी जास्त आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध भागात एनडीआरएफची 4 पथके तैनात केली असून, आपत्ती व्यवस्थापनचे जवानसुद्धा तैनात केले आहेत. कालपासून जवळपास 25 गावातील 5 हजार लोकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले असून, पाणीपातळी जस जशी वाढत आहे तसे लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिखली गावातील नागरिकांनी यावर्षी स्वतःहून स्थलांतर केले असून, प्रशासनाला सहकार्य केले आहे. दरम्यान, याच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर अजूनही बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनसुद्धा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.