कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 108.50 मिमी पावसाची नोंद झाली तर, सर्वात कमी शिरोळ तालुक्यात 6 मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात मात्र, पावसाचा जोर किंचित मंदावल्यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी बंद झाले आहेत. सद्यस्थितीत एकूण सात स्वयंचलित दरवाजांपैकी केवळ दोन दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवाय विद्युत विमोचकातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूण 4 हजार 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा वाढतच चालली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरूच; धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता
राधानगरी धरणातून एकूण 4 हजार 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा वाढतच चालली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगेची सध्याची पाणीपातळी 40 फुटांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगेची सध्याची पाणीपातळी 40 फुटांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय काही वाहतूक मार्ग सुध्दा बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नदीची पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अनेकांनी स्वतःहून स्थलांतर केले आहे. चिखली गावातील नागरिकांना सुद्धा कालपासूनच स्थलांतराचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गावातील बहुतांश नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर केले आहे तर अनेक जण गावमध्येच सुरक्षितस्थळी गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यात 4 ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान सुद्धा पुरबाधित क्षेत्रात तैनात करण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यातील इतर धरणांमधून खालीलप्रमाणे पाणी विसर्ग सुरू आहे -
- तुळशी - 328 क्युसेक
- वारणा -12984 क्युसेक
- दुधगंगा - 4800 क्युसेक
- कासारी - 1750 क्युसेक
- कडवी -1608 क्युसेक
- कुंभी - 350 क्युसेक
- पाटगाव -00 क्युसेक
- चिकोत्रा -00 क्युसेक
- चित्री -1568 क्युसेक
- जंगमहट्टि - 335 क्युसेक
- घटप्रभा - 6331 क्युसेक
- जांभरे-1694 क्युसेक
- कोदे -703 क्युसेक
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी - - हातकणंगले - 18.38 (450) मिमी
- शिरोळ - 6 (360) मिमी
- पन्हाळा - 50.71 (1269.29) मिमी
- शाहूवाडी - 52.50 (1567.50) मिमी
- राधानगरी - 49.83 (1702.67) मिमी
- गगनबावडा -108.50 (4241.50) मिमी
- करवीर - 43.64 (934.91) मिमी
- कागल - 28.71 (1125.57) मिमी
- गडहिंग्लज - 17 (794.43) मिमी
- भुदरगड - 48.40 (1315.80) मिमी
- आजरा - 42.75 (1841.50) मिमी
- चंदगड - 46.33 (1912.50) मिमी
जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत असलेल्या पाणीसाठ्यावर एक नजर : - तुळशी 92.90 दलघमी
- वारणा 894.35 दलघमी
- दूधगंगा 665.98 दलघमी
- कासारी 6 6.95 दलघमी
- कडवी 71.24 दलघमी
- कुंभी 68.98 दलघमी
- पाटगाव 105.24 दलघमी
- चिकोत्रा 37.50 दलघमी
- चित्री 53.414 दलघमी
- जंगमहट्टी 34.651 दलघमी
- घटप्रभा 44.170 दलघमी
- जांबरे 23.230 दलघमी
- कोदे (ल.पा) 6.060 दलघमी
बंधाऱ्यांची पाणी पातळी खालीलप्रमाणे आहे - - राजाराम 39.9 फूट
- सुर्वे 37.6 फूट
- रुई 67.9 फूट
- इचलकरंजी 63 फूट
- तेरवाड 58.3 फूट
- शिरोळ 57 फूट
- नृसिंहवाडी 57 फूट
- राजापूर 45.3 फूट