कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. मंगळवारी (दि. 16 जून) सकाळपासूनच पावसाची संततधार आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. आज (दि. 17 जून) सकाळी 8 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार येथील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत पाच फुटांची वाढ होत ती 22.7 फुटांवर गेली आहे.
कोल्हापुरात मुसळधार; रात्रभरात राजाराम बंधाऱ्यातील पाणीपातळीत 5 फुटांनी वाढ - kolhapur rain news
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी वाढली आहे. सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळीत मागील बारा तासांत पाच फुटांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील तब्बल 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी (दि. 16 जून) रात्री 8 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17.4 फूट होती. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षीच्या महापुराचा अनुभव पहाता यावर्षी जिल्ह्यातील आपत्कालिन यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पथके तैनात करण्यात आली आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनकडे मोठ्या प्रमाणात बोट आणि इतर साहित्य सामाजिक संस्था आणि व्यक्तींकडून मिळाले आहे. तर, काही गोष्टी स्वतः प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. शिरोळ तसेच आंबेवाडी, चिखलीमध्ये सुद्धा पुराचा धोका ओळखून तेथील नागरिकांना सूचना येताच गाव सोडून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -कोल्हापुरातून सांगली, सातारा जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांसाठी दैनंदिन पास, 'यांना' मिळणार दिलासा