कोल्हापूर : वारणा काठच्या गावांना पुराचा मोठा फटका; अनेकांना सुरक्षितस्थळी हलवले - हातकणंगले पूर
वारणा नदीला आलेल्या पुरामुळे खोची, भेंडवडे, निलेवाडी, जुने चावरे, ऐतवडे (पर्वतवाडी), जुने पारगाव, लाटवडे यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. या गावातील लोकांना, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
कोल्हापूर - शहरासह जिल्हात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. वारणा नदीने रौद्ररुप धारण केले असून नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याची पूरस्थिती ही २००५ च्या पुरापेक्षा गंभीर आहे. यामुळे वारणा काठच्या शेतातील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वारणेला आलेल्या पुरामुळे खोची, भेंडवडे, निलेवाडी, जुने चावरे, ऐतवडे (पर्वतवाडी), जुने पारगाव, लाटवडे यासह अनेक गावात पाणी शिरले आहे. या गावातील लोकांना, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बहुतांश शेतजमिन पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान तर झालेच असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूरपरिस्थिती अजूनही कायम राहिल्यास या भागातील ऊस पिक वगळता इतर पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांनी घर-दार सोडताना घरगुती साहित्य, धान्य घरीच उंच भागावर ठेवली आहेत. पुराचे पाणी आणखीन वाढल्यास घरगुती साहित्यांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. मातीच्या भितीं असलेल्या घरांची पडझड झाल्याचे चित्र आहे.