कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा ( Stop Widow Tradition ) निर्णय घेतला. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अनेक ग्रामपंचायती विशेष सभा घेऊन निर्णय घेणार आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव नंतर आता पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायतीने ( waghave village stop widow tradition ) सुद्धा सामाजिक क्रांतीची मशाल पुढे नेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. ( Waghave Gram Panchayat approves resolution )
घरफाळा आणि पाणीपट्टी माफीचा निर्णय - जे कुटुंब या निर्णयाची अंमलबजावणी करेल त्या संबंधित कुटुंबाला एक वर्षासाठी घरफाळा आणि पाणीपट्टी माफीचीही घोषणा वाघवे ग्रामपंचायतीने केली आहे. ग्रामपंचायत सरपंच प्रदीप पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून झालेल्या विशेष सभेमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी संजय पांडुरंग शेलार हे सूचक होते तर संजय नामदेव सुतार यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, अशाचप्रकारे यापुढे सुद्धा सर्वच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विधवा स्त्रियांना सन्मान मिळत रहावा अशी अपेक्षा सुद्धा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
हेरवाडग्रामपंचायतीने घेतला होता पहिला निर्णय - कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड (Herwad Gram Panchayat ) ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विधवा महिलांना सन्मान मिळवून देणारा विधवा प्रथा बंदकरण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. ही कोल्हापुरातील पहिली ग्रामपंचायत होती.