गावबंदीच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकाचे मत कोल्हापूर Maratha Reservation Issue :आता मराठा आरक्षणाची धग राज्यभरात वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाज आता चांगलाच आक्रमक होऊ लागला आहे. मंगळवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाचा विषय प्रमुख नेत्यांच्या भाषणांमध्ये प्राधान्याने मांडला गेला; मात्र आता मराठा आरक्षणाचा प्रश्न गाव पातळीपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठका घेऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव सभेत घेण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील खिंडी-व्हरवडे आणि चंदगड तालुक्यातील निट्टूर गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राजकीय पुढाऱ्यांनी गावात येऊन अपमान करून घेऊ नये, अशा आशयाचे डिजिटल बोर्ड गावातील चौका-चौकात लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्या जरांगे पाटील यांना पाठिंबा देत सकल मराठा समाजाने नेत्यांना प्रवेशबंदीचा निर्णय घेतला असल्याचं खिंडी वरवडे गावच्या ग्रामस्थांनी सांगितलं. (Maratha Reservation Update)
तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय :केंद्रातील भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. असं न केल्यास येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून तालुक्यांमध्ये 'रास्ता रोको' करण्याचा निश्चयही खिंडी व्हरवडे आणि चंदगड तालुक्यातील निट्टूर गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवावा : मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? मराठा आरक्षण न देण्याचं कारण काय? मराठा आरक्षणासाठी आजपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी शांततेनं आंदोलन करावं. आम्ही मराठा आरक्षणाशिवाय थांबणार नाही. ११ दिवस जास्तीचे देऊनही सरकारकडून कोणतीही हालचाल नाही. मराठ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून आंदोलन करत आहे. आरक्षणाबाबत सरकार निरुत्साही आहे. मुख्यमंत्र्यांचा आदर, पण सन्मानाचे काय? त्यांनी आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवावा. एकदा उपोषण सुरू झाले तर राजकीय नेत्यांशी चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी बोलून दाखविलं आहे.
झारीतील शुक्राचार्य कोण? -राज्य सरकारला विनंती करूनही आरक्षणासाठी काही केलं नाही. सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर नाही. कुणबी शब्दाची लाज वाटत असेल तर शेतीवर पाय ठेवू नका. आज ४१ वा दिवस असून सरकार काय करतंय? मराठा आरक्षणासाठी मोदींनी सरकारला फक्त एक फोन करावा. त्यांनी एक फोन केला तरी आरक्षण मिळते. मुख्यमंत्र्यांना आरक्षणापासून अडविणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. ही नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत, असं आवाहन देखील त्यांनी केलं. आरक्षणाला कुणाचा विरोध याचा शोध घेतला जाणार आहे. सरकारमध्ये काहीतरी शिजतयं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आरक्षणाकरिता शिवरायांची शपथ घेतली, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
हेही वाचा:
- Maratha Reservation update: मराठा आरक्षणासाठी मोदींनी राज्य सरकारला फक्त एक फोन करावा-मनोज जरांगे
- Sanjay Raut on Maratha Reservation: मराठा आरक्षणाकरिता तिसरी आत्महत्या झाल्यास...संजय राऊत यांचा सरकारला इशारा
- Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक; मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम