कोल्हापूर - शहरातील सीपीआर रुग्णालयात तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली 18 व्हेंटिलेटर्स दुरुस्त करुन कार्यान्वित केली जात असल्याची माहिती, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली. 'ईटीव्ही भारत'ने याबाबत बातमी प्रसारित केली होती. शिवाय बंद अवस्थेत असलेले व्हेंटिलेटर तत्काळ दुरुस्त करून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची गरज असल्यासोबतच आणखी ऑक्सिजन बेडची सुद्धा गरज असल्याची समस्या मांडली होती. या संदर्भात सीपीआर प्रशासनाने दखल घेतली आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय 1 ऑगस्ट 2020पासून संपूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी नॉन इनवेझिव्ह आणि इनवेझिव्ह अशी 114 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यामध्ये 54 व्हेंटिलेटर्स व 60 नॉन इनवेझिव्ह व्हेंटिलेटर्स अशी मिळून 114 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यातील 18 व्हेंटिलेटर बंद होती. ती तत्काळ दुरुस्त करून घेण्यात आल्याची माहिती सीपीआर अधिष्ठाता मस्के यांनी दिली. शिवाय अतिरिक्त 23 व्हेंटिलेटर्स सुद्धा कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे सीपीआरकडे 430 खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचेही मस्के यांनी म्हटले आहे.