कोल्हापूर -मोठ्या आणि आलिशान महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. ( Vehicles Thieves Arrested by Kolhapur police ) पाच कोटी पाच लाख रुपये किंमतीच्या 31 आलिशान मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ( 31 Car Seized by Kolhapur Police ) जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (वय-42, रा. क्रॉस मशीद गल्ली, गांधीनगर, जिल्हा बेळगाव), यश प्रशांत देसाई (वय-26, रा. बोरमाळ, शहापूर, जिल्हा बेळगाव), खलील महंमद लियाकत सारवान (वय-40, रा. सुभाषनगर, जिल्हा बेळगाव) यांचा समावेश आहे.
आंतरराज्य टोळीने नवीन आणि महागड्या आलिशान मोटारी चोरून कारच्या नंबर बदलून त्याची विक्री केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मणिपूरमधील गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली. या सर्व गाड्या वेगवेगळ्या राज्यातील असून यात प्रामुख्याने आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली येथील आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव व त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
अशी केली अटक -
कार बनविणारे कंपन्यांनी कार चोरीस जावू नये याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करून कार बनवत असताना मात्र अलिकडील कालावधीत कार चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे याच्यावर त्वरित नियत्रंण मिळावे म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरासह जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपी जहीर अब्बास हा आरोपी गुन्ह्यातील चोरलेली गाडी विकण्याकरीता ६ जानेवारीला कोदाळी (ता. चंदगड) येथील ग्रीन हील रिसॉर्ट या हॉटेलजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून तेथे सापळा रचून ग्रीन हील रिसॉर्टचे पार्किंगमध्ये जहीर अब्बास व त्याचे 2 जोडीदार यश देसाई आणि खलीद महंमद सारवान यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यातील चोरीस गेले स्वीफ्ट डिझायर गाडीसह इतर राज्यातील चोरीच्या 07 चारचाकी गाड्याही त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. यानंतर आरोपी खलीद महंमद याची चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी 5, अशा एकूण 13 चोरीच्या गाड्या जप्त केल्या.