कोल्हापूर :सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तुत्वाने जगाच्या नकाशावर कोल्हापूरने आपली वेगळी ओळख अधोरेखित केली आहे. धर्म, जाती, पंतांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन फक्त कोल्हापुरातच पाहायला मिळते. याच कोल्हापुरात गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ धर्माच्या भिंती तोडून वसंतराव मुळीक (नाना) आणि कादर (भाई) मलबारी यांनी सामाजिक सलोख्याची मैत्री जपली आहे. या काळात दोघांच्या पुढाकाराने 80 समाज, संघटना एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे, एकीकडे सोशल मीडियातील मजकुरावरून जातीय तणाव निर्माण होत असताना, दुसरीकडे मात्र धर्म बाजूला सारत भाईचारा जपणारी ही मैत्री जगावेगळी ठरते.
हिंदू आणि मुस्लिम दरी कमी करण्यासाठीप्रयत्न :वसतिगृहांची जननी, पुरोगामी विचारांचे शहर अशी कोल्हापूरची ओळख असताना कोल्हापुरात जातीय दंगलीचे काळे ढग काही दिवसांपूर्वी जमले होते. कोल्हापूरात सामाजिक सलोख्याची विण उसवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा असलेल्या या शहरात धार्मिक दंगलीचा हा प्रयत्न हाणून पडला. पेठा-पेठांमध्ये कमालीची इर्षा शहरात पहायला मिळते. मात्र धर्माचा आधार घेऊन विष पसरवणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कोल्हापूरकर एकवटतात, तेव्हा विषाचे वातावरण एकीमध्ये बदलण्यास वेळ लागत नाही. शहर आणि जिल्ह्यात मराठा महासंघाच्या माध्यमातून गेली 40 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक तथा ट्रस्ट बॉडीचे सदस्य कादरबाई मलबारी पुढाकार घेऊन, हिंदू आणि मुस्लिम समाजातील दरी कमी करण्यासाठी गेली 30 वर्ष कार्यरत आहेत.