कोल्हापूर Varpe PC Kolhapur :शनिवार पेठमध्ये असणाऱ्या शिवगंगा अपार्टमेंटमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. याच अपार्टमेंटमध्ये राजेंद्र वरपे वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या टेरेसवरती वारंवार होणाऱ्या राजकीय पार्ट्यांचा अपार्टमेंटमधील वरपे कुटुंबीयांना त्रास होत होता. यापूर्वी याबाबत माजी आमदार क्षीरसागर यांना कळवूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. शनिवारी मध्यरात्री टेरेसवर असाच प्रकार सुरू असताना वरपे हे क्षीरसागर यांना जाब विचारायला गेले; मात्र यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर, पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून वरपे यांच्यासह त्यांच्या 15 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. यामध्ये राजेश क्षीरसागर आणि त्यांचा पुत्र ऋतुराज हा वरपे कुटुंबीयांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. वरपे यांनी रविवारी मध्यरात्री याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात धाव घेत राजेश आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या :राजेंद्र वरपे यांची 22 वर्षीय मुलगी सिद्धी वरपे हिने थेट मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिद्धीने मुख्यमंत्र्यांना थेट साद घालत शेजारील रहिवाशी राजेश क्षीरसागर यांच्यापासून कुटुंबीयांच्या जीवितीला धोका आहे. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला न्याय द्या. अन्यथा आम्ही अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उड्या मारून आत्महत्या करू असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिवाल्वरचा परवाना रद्द करा :माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे परवाना असलेली रिवाल्वर आहे. क्षीरसागर कुटुंबीयांकडून वारंवार वरपे कुटुंबीयांना तुम्हाला गोळ्या घालतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. क्षीरसागर कुटुंबीयांकडून आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्षीरसागर यांच्याकडे असलेला रिवाल्वरचा परवाना रद्द करावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत सिद्धी वरपे हिने केली. परस्पर दोन्ही गटांकडून जिल्हा पोलीस दलाला निवेदन प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रकरणांची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.