कोल्हापूर - एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा भासत आहे. त्यातच राज्यात अनेक ठिकाणी लस वाया जाण्याच्या घटना सुद्धा समोर येत आहेत. असे असताना कोल्हापुरात मात्र प्राप्त व्हायलमध्ये (कुप्पी) अपेक्षीत लाभार्थ्यांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. हे सर्व कस शक्य झाले, जिल्ह्यात एकूण किती डोस मिळाले आणि प्रत्यक्षात किती जणांचे लसीकरण झाले याचा आढावा घेणारी 'ईटीव्ही भारत'ची विशेष बातमी
जिल्ह्यातील सद्यस्थितीत झालेले लसीकरण
कोल्हापूर जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2021 पर्यंत जिल्ह्यात एकूण 95 हजार 165 कोरोना लसीच्या कुप्प्या प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 92 हजार 473 व्हायल वापरण्यात आल्या आहेत. एका व्हायलमध्ये 10 जणांचे लसीकरण करण्यात येते. वापरलेल्या 92 हजार 473 व्हायलनुसार जिल्ह्यात 9 लाख 24 हजार 730 लाभार्थ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात 9 लाख 37 हजार 643 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल 12 हजार 913 जादा लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही देसाई यांनी दिली.
प्राप्त कुप्प्यांमध्ये जादा लाभार्थ्यांचे लसीकरण कस शक्य
कोल्हापूर जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उपलब्ध लसीचा पुरेपूर वापर करण्याच्या सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका व्हायलमध्ये 5 मिली लस असते. त्यामध्ये प्रत्येकाला 0.5 मिली प्रमाणे 10 जणांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, अनेक व्हायल मध्ये 10 जणांचे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात लस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे एकूण व्हायलच्या माध्यमातून जादा लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. म्हणूनच लसीचा काटेकोरपणे उपयोग करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कशा पद्धतीने लस देता येईल याकडे लक्ष देण्याचाही सूचना देण्यात आल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एक व्हायल फोडल्यानंतर पुढच्या 4 तासांच्या आत त्यातील लस संपवणे बंधनकारक आहे. 4 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास लस खराब होते, अशीही माहिती त्यांनी दिली.