कोल्हापूर -महाराष्ट्र सरकारने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर टाकल्याने कोल्हापुरात देखील या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही. मात्र, ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार असल्याचे लसीकरण प्रमुख फारूक देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
कोल्हापुरात १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण लांबणीवर १८ वर्षांवरील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र, पुरेशा लसीअभावी या मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकारने १८ वर्षांवरील लसीकरण होणार नाही, असे जाहीर केल्याने कोरोनाची दुसरी लाट आणखी गंभीर ठरू शकते. देशातील लस उत्पादक कंपन्या सीरम इन्सिट्यूट आणि भारत बायोटेकने डोस देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण करणे अशक्य झाले आहे.
लस पुरवठ्यात खंड नाही - केंद्रीय आरोग्य मंत्री
लसीकरण मोहिमेतील राज्यांच्या कामगिरीनुसार लसींचे डोस दिले जात आहेत. आम्ही राज्यांना १६ कोटी डोसचा पुरवठा केला आहे. त्यापैकी १५ कोटी डोस दिले आहेत. अजूनही १ कोटी डोस शिल्लक आहेत. आणखी काही लाख डोस येत्या २ ते ३ दिवसांत पुरवले जातील. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून लसीच्या पुरवठ्यात एक दिवसाचाही खंड पडलेला नाही, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे.
अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती -
महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, पंजाब आणि गुजरात सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला कोवीशिल्ड लसीच्या २ कोटी आणि भारत बायोटेकला ५० लाख डोसची ऑर्डर दिली आहे. मात्र, हे डोस सध्या उपल्ध होणार नाहीत. दिल्ली सरकारकडेही लस उपलब्ध नसल्याने त्यांनी देखील लसीकरणाबाबत असमर्थता दर्शवली आहे. तामिळनाडू सरकारनेही दीड कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. जूनपर्यंत ही लस उपलब्ध होणार नाही, असे एका कंपनीने सांगितले. त्यामुळे १ मेपासून लसीकरण होणार नाही. पंजाबसाठी सध्या १० लाख डोसची गरज आहे. मात्र, जोपर्यंत डोस मिळत नाही तोपर्यंत लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करणार नाही, असे या राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.