कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मंत्रीमंडळाला आता कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. यातील अनेकजण आता सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने राजीरामा दिला पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही सत्तेसाठी हे म्हणत नाही. मात्र, सर्वसामान्य लोकसुद्धा आता म्हणत असतील की ज्यांच्याकडून आम्ही सुरक्षेची अपेक्षा करत असतो तेच गृहमंत्री तुरुंगात जात असतील तर काय बोलणार? त्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कायद्यासमोर सर्व सामान; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 1200 कोटींची प्रॉपर्टी सील -
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आज सर्वसामान्य माणसाला विश्वास वाटला आहे की, कायद्यापुढे सगळे समान आहेत. एकूणच 2014साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झिरो टॉलरन्स नावाचा त्यांनी शब्द वापरला आहे. तो म्हणजे मै खाऊंगा नही और किसी को खाने दुंगा नही. मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. आमच्या भाजपचा सुद्धा असला तरी अशी चूक करून भ्रष्टाचार केला, गुन्हा केला तर कोणाचीही सुटका नाही, असा इशारा दिला. त्यानुसार सर्वसामान्य माणसांना मोदी यांच्याबाबतचा आदर वाढला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधीतसुद्धा जवळपास 1200 कोटींची प्रॉपर्टी सील केली असल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांना आता परवानगी शिवाय ही प्रॉपर्टी विकता येणार नाही. त्यामुळे अशा सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य चालविण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.