कोल्हापूर - कोरोनाबाधित दोन कैद्यांनी कोव्हिड सेंटरमधून खिडक्यांचे लोखंडी रॉड कापून पलायन केले आहे. कोल्हापूरातील कळंबा आयटीआय कोव्हिड सेंटरमधून कैद्यांनी पलायन केले असून गोदाजी नंदीवाले आणि प्रतीक सरनाईक अशी दोन्ही पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघेही जिल्ह्यातीलच असून त्यांच्यावर खून आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. सद्या ते कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होते. काल रात्री याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दाखल होते गंभीर स्वरूपाचे गुन्हे -
कोरोनाची लागण झालेल्या काही कैद्यांवर कोल्हापूर येथील कळंबा आयटीआयमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास गोदाजी नंदीवाले आणि प्रतीक सरनाईक हे दोघे कैदी खिडक्यांचे लोखंडी रॉड कापून पळून गेले. कैदी पळून जात असताना बाजूच्या इतर कैद्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांनी उडी टाकून पलायन केले होते. सुरक्षारक्षकांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकून त्यांना या परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुठेही दिसून आले नाहीत. रात्री उशिरा याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पळून गेलेले दोन्ही कैदी कोल्हापूर जिल्ह्यातीलच असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
हेही वाचा - वाघिणीच्या 'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार