कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. अद्याप पावसाने उघडीप दिली नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.