कोल्हापूर- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. 4 मे) सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 18 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू राहणार असून दुपारी दोनपर्यंत चित्र स्पष्ट होईल. तर या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रतिनिधी व पत्रकरांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 2 मे) मतदान झाले. या 70 मतदान केंद्रावर मतदान झाले. या मतदानामध्ये तब्बल सात तालुक्यात केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले तर एकूण सरासरी मतदान 98.78 टक्के झाले. गोकुळच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वात चर्चेची ठरलेली ही निवडणूक आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू आघाडी समोर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत जोरदार असे आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.