कोल्हापूर - भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणी आणखी तीन आरोपींना विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मुंबई, पुणे येथून या आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी सचिन अंदुरे याला पुणे येथील कारागृहातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहामधून ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तीनही आरोपींनी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी आरोपी सचिन अंदुरे याने न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. मी सीबीआय कोठडीत असताना पोलीस अधिकाऱ्याने माझा छळ केला. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत तिरुपती काकडे यांनी मला त्रास दिला, असा धक्कादायक खुलासा सचिन अंदुरे याने केला. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आरोपी सचिन अंदुरे याने न्यायालयात दिली.
सचिन अंदुरे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तर, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन हे कन्नड लेखक व विचारवंत एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहेत.
१६ फेब्रुवारी 2015 ला पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोल्हापुरातील त्यांच्या घराजवळच ही घटना घडली होती. घटनेच्या चार दिवसानंतर गोविंद पानसरेंचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.