कोल्हापूर - येथे सामाजिक संसर्ग होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे धोरण राबवत त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग झाला नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.
मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 378 आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकही स्थानिक रुग्ण नाही. तपासणी नाक्यावरून त्यांना कोव्हीड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी केले. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रुग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रुग्ण आपण शोधलेले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.