कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही. मात्र त्याचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला अधिक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे रुग्ण आढळले आहेत. त्या जिल्ह्यातील लोक उपचार घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलताना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ९ हजार ६५३ इतके लोक कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यात आज दोन हजार इतक्या रुग्णांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी दिली. तसेच जिल्ह्यात डेल्टा प्लसचे संक्रमण रोखण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नगिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळले आहेत. या जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी कोल्हापूर मध्ये ये-जा करत असतात. त्यामुळे याचा धोका कोल्हापूरला असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना केल्या. दरम्यान मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील विविध गोष्टींचा आढावा घेतला. त्यावेळी सीएसआर फंडातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 23 हजार इंजेक्शन उपलब्ध होतील. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट कमी येण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली. मात्र त्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढतच असल्याचे मुश्रीफ म्हणाले. स्थानिक व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकान सुरू ठेवण्याचा इशारा दिला असला तरी कोल्हापूर जिल्हा हा फेज चार मध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारने वर्गवारी केलेल्या नुसार नियम चालू राहतील. व्यापारी वर्गाला सर्वाधिक फटका बसला असला तरी सर्वांनी नियम पाळावेत, अशी विनंती मुश्रीफ यांनी जनतेला केली. लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार -
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्य सरकारकडे पाठपुरावा करू करूनच संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण हा एक मात्र पर्याय आहे त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्लस कसे असतील या दृष्टीने राज्य सरकारकडे प्रयत्न करू असे मुश्रीफ म्हणाले