कोल्हापुर: कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहर आणि उपनगरात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी प्रवेश करत 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या परिसरात धाडसी चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
20 तोळे केले लंपास: कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात सुरज हिराप्पा सुतार हे भाड्याने राहतात. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास, अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये सुरज सुतार हे आपल्या पत्नी, मुलगी आणि भाच्यासह बंगल्यातील एका रूममध्ये झोपले होते. बंगल्यातील एका रूममधील कपाटातील साहित्य विस्कटून कपाटात असणारे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड लंपास केली.
सीसीटीव्हीच्या आधारे चोट्यांचा शोध:तब्बल तीन तास चोरटे या बंगल्यात वावरत होते. यानंतर त्यांनी त्या बंगल्यातील सुतार यांची मोपेड घेऊन पसार झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरज सुतार आणि कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे निदर्शनास आले, चोरी तात्काळ शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबतची माहिती दिली. याठिकाणी ठसे तज्ञ आणि श्वान पथक देखील दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोट्यांचा शोध घेत आहेत.