महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Teacher's Day - कुणाचाही वशिला आणा 'या' शाळेत गुणवत्तेशिवाय प्रवेश नाही, पटसंख्या 35 वरून 1 हजारवर; ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - कोल्हापूर जिल्हा

जिल्हा परिषदेच्या शाळेंची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मात्र, खासगी शाळांनासुद्धा लाजवणारी कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमधील कुमार विद्यामंदिर क्रमांक 3 या जिल्हा परिषदेच्या शाळेने केली आहे. (8 ते 10)वर्षापूर्वी ज्या शाळेची पटसंख्या केवळ 35 इतकी होती, त्या शाळेची पटसंख्या आज तब्बल एक हजारहून अधिक झाली आहे. 10 वर्षांपूर्वी जितकी शाळेची पटसंख्या होती, तेव्हढे शिक्षक आता या शाळेमध्ये कार्यरत आहेत. पहा काय आहेl शाळेच्या या यशामागील कारणे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून-

कुमार विद्यामंदिर, कुरुंदवाड येथील जिल्हा परिषद शाळा
कुमार विद्यामंदिर, कुरुंदवाड येथील जिल्हा परिषद शाळा

By

Published : Sep 5, 2021, 4:25 PM IST

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवल्याने दिवसेंदिवस अनेक शाळा बंद पडत चालल्याची उदाहरणे आहेत. शिवाय पालकांच्या डोक्यातही आपला मुलगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवा या भावनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेंची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मात्र, खासगी शाळांनासुद्धा लाजवणारी कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमधील कुमार विद्यामंदिर क्रमांक 3 या जिल्हा परिषदेच्या शाळेने केली आहे. (8 ते 10)वर्षापूर्वी ज्या शाळेची पटसंख्या केवळ 35 इतकी होती, त्या शाळेची पटसंख्या आज तब्बल एक हजारहून अधिक झाली आहे. 10 वर्षांपूर्वी जितकी शाळेची पटसंख्या होती, तेव्हढे शिक्षक आता या शाळेमध्ये कार्यरत आहेत. असे या शाळेत काय आहे, जेणेकरून या शाळेत राजकीय नेतेही आपल्या संबंधितांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षकांना विनंती करत असतात. पाहुयात 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून-

कुमार विद्यामंदिर क्रमांक 3, कुरुंदवाडमधील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आपले मत व्यक्त करताना

'शाळेची सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातही अव्वल स्थानी'

शाळेच्या प्रगतीच्या चढत्या आलेखाबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील म्हणाले, सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाड मधील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर क्रमांक 3 या शाळेची पहिली ते सातवी'ची एकूण पटसंख्या 35 होती. शिवाय केवळ 3 शिक्षक त्यावेळी कार्यरत होते. अनेक शैक्षणिक उपक्रम, त्याचबरोबर शारीरिक उपक्रम, क्रीडा शिक्षण त्याचबरोबर शिक्षकांचे कष्ट यामुळे पटसंख्या वाढतच गेली. एकीकडे जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये (2007 ते 2021)या चौदा वर्षाच्या कालावधीत दोन लाख विद्यार्थी कमी झाले असताना, याच संघर्षाच्या काळात जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर क्रमांक 3 या शाळेने 35 वरून पटसंख्या 1 हजार 7 वर नेली असून, शिक्षकसंख्या पूर्वी जितके विद्यार्थी होते, तितकी झाली असल्याचेही रविकुमार पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय ही पटसंख्या जिल्हा परिषदे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात तर सर्वाधिक आहेच पण महाराष्ट्रातसुद्धा अव्वल ठरली आहे. हा लौकिक जिल्हा परिषद कोल्हापूरला प्राप्त झाला आहे.

'मराठी, इंग्लिश आणि सेमी या तिन्ही माध्यमातून विद्यार्थी घेत आहेत शिक्षण'

गेल्या अनेक वर्षांत या शाळेने अनेक चढउतार पाहिले असल्याचे इथल्या शिक्षकांनी म्हंटले आहे. शाळेची पटसंख्या 35 वरून 1 हजार पार पोहोचवणे हे तसे पाहिले तर इतके सोपेसुद्धा नव्हते. असेही त्यांनी म्हंटले आहे. यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत शिक्षणाचा दर्जा, अभ्यासाबरोबरच इतर सर्वच गोष्टींमध्ये मुलांना मार्गदर्शन, शैक्षणिक अभ्यासाबरोबर व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी वारंवार चिमुकल्यांचा आठवडी बाजार एव्हढेच नाही, तर मुलांच्यातील कला ओळखून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक स्पर्धेत सहभागीसुद्धा करण्याचे काम शाळेतील शिक्षकांनी केले आहे. त्यामुळेच शाळेची पटसंख्या वाढायला सुरुवात झाली. खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मराठी बरोबरच इंग्लिश आणि सेमी माध्यमसुद्धा सुरू केले. त्यामुळे आज या शाळेत 1 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

'प्रवेश बंदचे फलक लावण्याची दरवर्षी वेळ'

शाळेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आजूबाजूच्या जवळपास 10 ते 15 गावातील अनेक पालक आपल्या मुलांना कुमार 3 या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असतात. काहीजण राजकीय नेत्यांना आपण फोन प्रवेश मिळवून द्यावा अशी विनंतीसुद्धा करतात. मात्र, दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याने आणि शाळेतील वर्गखोल्या कमी पडत असल्याने शेवटी शाळेबाहेर 'प्रवेश फुल्ल' असा फळकच लावावा लागतो असेही इथल्या शिक्षकांनी म्हंटले आहे. पालकांनी आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याने आम्हा शिक्षकांवरही मोठी जबाबदारी पडत असल्याचेही शिक्षकांनी म्हंटले आहे.

कुरुंदवाड मध्ये तब्बल 7 जि. प. च्या शाळा, इतर खाजगी 13 शाळा तरीही कुमार 3 शाळेत 'प्रवेश फुल्ल'

कुरुंदवाडमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण सात प्राथमिक शाळा आहेत. शिवाय खाजगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमाच्या सहा प्राथमिक शाळा आहेत. त्याशिवाय हायस्कूलची संख्या सात आहे. एकूण वीस शाळा एक किलोमीटरच्या परिघामध्ये आहेत. आशा स्पर्धेतसुद्धा जिल्हा परिषदेची ही शाळा तग धरून पाय रोवून दिमाखात उभी आहे. विशेष म्हणजे, ही शाळा जिल्हा परिषदेची असल्यामुळे स्थानिक नगर परिषद त्यावर कोणताही खर्च करू शकत नाही. तर शाळा नगरपालिका कार्यक्षेत्रात असल्यामुळे तेथे जिल्हा परिषद फंडातून या शाळेसाठी निधी खर्च केला जात नाही. अशामुळे या शाळेला भौतिक सुविधांचा प्रचंड वाणवा असून, देखील शिक्षकांनी अनेकवेळा जिद्दीने स्वतःच्या पैशातून अनेकविध सुविधा तयार करून शाळेची पत राखली आहे.

'विद्यार्थ्यांची अनेक जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी'

शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेतील इतर शिक्षकांनी म्हंटले की, आमच्या शाळेला एक गुंठासुद्धा क्रीडांगण नसताना जिल्हा परिषदेचे क्रीडा 'अध्यक्ष चषक' या शाळेने पटकावले आहे. 'दोरीवरचा मल्लखांब यामध्ये राज्यस्तरीय विजेतेपद पटकाविले आहे. अबॅकसमध्ये आंतरराष्ट्रीय यश प्राप्त केले. शाळा सिद्धीमध्ये सातत्याने 'अ' वर्ग मानांकन कायम ठेवले आहे. पाचवी शिष्यवृत्ती सातारा सैनिक प्रवेश परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, चौथी व सातवी प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस बरोबर गणित प्रज्ञा व प्राविण्य स्पर्धा, होमी भाभा ज्युनिअर सयंटिस्ट कॉम्पिटेशन, एमटीएस, बिडीएस, यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षेतून दरवर्षी अनेक विद्यार्थी चमकदार कामगिरी करत असतात. फक्त पटसंख्येतच ही शाळा फक्त अव्वल नसून, गुणवत्तेमध्येसुद्धा सातत्याने अव्वल ठरली आहे.

'शिक्षणाबरोबरच 'या' क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण'

लेझीम पथक, झांज पथक, तबला वादन, क्रीडा प्रशिक्षण, सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, उन्हाळी शिबिर, योग वर्ग, पथनाट्य, चित्रकला, पोहणे, ॲथलेटिक्स याचेही शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. या क्षेत्रातसुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला करीअर करण्याची आवड असेल तर त्यावर अधिक भर दिला जातो. असेही, शिक्षकांसह, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा म्हंटले आहे. एव्हढेच नाही तर शाळेमध्ये संगणक, वायफाय यंत्रणा, सीसीटीव्ही सुविधा, सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना या सुविधा दिल्या जातात.

'18 वर्गखोल्यांची गरज; शिक्षकांचा पाठपुरावा'

बेंचेस कमी, वर्गखोल्या कमी, प्रसाधनगृहाची कमतरता इत्यादी अनेक अडचणी वाढत्या पट संख्येमुळे झालेल्या आहेत. पण शिक्षकांनी स्वतः तिसऱ्या मजल्यावर पत्र्याच्या चार खोल्या, दुसऱ्या मजल्यावर गणपती मंदिरा शेजारी दोन खोल्या आणि धर्म शाळे जवळ एक खोली अशा सात वर्गखोल्या निर्माण करून अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेला अद्याप 18 वर्गखोल्यांची गरज असतानाही या शाळेने जिल्हा परिषदेच्या 'जे. पी. नाईक माझी शाळा समृद्ध शाळ' पारितोषिक व बक्षीस पटकावले आहे. जिल्हा परिषदेचा 'आदर्श शाळा पुरस्कार' तसेच ऋणानुबंध मंच इचलकरंजीचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षक बँकेच्या 'स्वच्छ व सुंदर शाळा' या पुरस्कारानेही शाळेला यापूर्वी गौरवण्यात आले होते. सध्या जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल त्यांच्या प्रयत्नातून तीन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत अशी माहितीही शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने काही निवडक आदर्श शाळेसाठी भौतिक सुविधा पुरवण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शासनाकडून आमच्या शाळेस आणखी काही भौतिक सुविधा पुरवल्या, तर शाळेच्या प्रगतीत आणखी भर पडेल असा विश्वासही यावेळी शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श.. मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप नाही

ABOUT THE AUTHOR

...view details