कोल्हापूर -त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात दिपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी हा कृष्णाकाठ उजळून निघाला. कोरोनामुळे दीपोत्सव रद्द होईल अशी शक्यता होती. मात्र, हजारो भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा झाला. यावेळी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दत्तगुरुंचे दर्शन घेत केलेल्या जल्लोषाने कृष्णाकाठ दणाणून गेला.
दीपोत्सव 2021 : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट भक्तांची अलोट गर्दी -दत्त मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सायंकाळपासून परिसरातील नागरिक याठिकाणी दाखल झाले होते. लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या दीपोत्सवाचा आनंद घ्यायला कृष्णा काठावर पोहोचले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र होते.
कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाटावरील दीपोत्सव रद्द -दरवर्षी, कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाटावर सुद्धा मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सलग दुसऱ्या वर्षी दीपोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा नदी घाटावर यावेळी शुकशुकाट पाहायला मिळाला. दरवर्षी पहाटे 3 वाजल्यापासून हजारो कोल्हापूरकर या ठिकाणी जमायला सुरुवात करत असतात. हजारो दिव्यांनी इथला परिसर उजळून निघत असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे कोल्हापूर कोरोनामुक्तीकडे चालले आहे. अशा वेळी नागरिकांनी एकत्र जमून असे कार्यक्रम घेऊ नये असे, आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार यंदाचा दीपोत्सव रद्द करण्यात आला. नागरिकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. काही अतिउत्साही नागरिकांनी मात्र घरातूनच दिवे घेऊन जात दीपोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला.