कोल्हापूर - रस्त्याअभावी महिलेला झोळीतून रुग्णालयात घेऊन जात असताना तिने जंगलामध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातल्या पेरणोली धनगरवाडा येथे ही घटना घडली. 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा ही घटना घडली असून सुदैवाने महिला आणि बाळ मात्र सुखरुप असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे. (Woman Gave birth Baby On road) दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे कोणाचातरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
गावातील 10-15 जणांनी मिळून झोळीतून आणावे लागले; वाटेतच प्रसूती
आजरा तालुक्यातल्या पेरणोली इथल्या धनगरवाड्यावरील जयवंत झोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी रंजना जयवंत झोरे यांना 21 फेब्रुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रसूतीकळा सुरु झाल्या. रस्ता नसल्याने त्यांना रुग्णालयात कसे घेऊन जायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर पडला. मात्र गावातील इतर 10-15 जणांनी मिळून घरातील चादरीची झोळी बनवून त्यातून घेऊन जाण्याचे ठरवले. रस्ता नसल्याने वाहन येऊ शकत नव्हते. शिवाय वाटेवर लाईटची सुद्धा सुविधा नाही. त्यामुळे लगेचच सर्वजन घरातील बॅटरीसह महिलेला झोळीतून घेऊन निघाले. मात्र पायथ्याला असणाऱ्या नावलकरवाडी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच जंगलातच असलेल्या एका ओढ्याच्या बाजूला झोळीमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. सुदैवाने यामध्ये महिला आणि बाळ सुखरूप आहेत अशी माहिती सुद्धा महिलेच्या पतीने दिली.