कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नवीन रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यात केवळ 30 रुग्ण उरले होते, त्यानंतर एकसारखे रुग्ण वाढू लागल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 135 वर पोहचली आहे. त्यामुळे, रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने नागरिकांसह प्रशासनाने सुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
हेही वाचा -मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा
दरम्यान, जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले होते. रुग्णांची संख्या कमी आल्यानंतर सेंटर बंद ठेवण्यात आले होते. भविष्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर यातील काही कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 108 वर पोहचली आहे. त्यातील 48 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे, सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 135 इतकी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर, एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 135 वर पोहचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 730 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे, तसेच मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात कमी जरी असले, तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे.
हेही वाचा -कोल्हापूरात फळभाज्यांचा दारात वाढ, गृहिणींची बजेट कोलमडले
जिल्ह्यात उत्तम उपाययोजना
कोरोना काळात कोल्हापूरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढले, तसेच उपाययोजनासुद्धा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याधुनिक सामग्रीसह कोविड सेंटर उभे करण्यात आले होते. त्यामुळे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणसुद्धा राज्यात चांगले होते. आतासुद्धा रुग्णसंख्या वाढली तर प्रशासन पूर्णपणे सज्ज असून अजूनही नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. महापालिकेकडून तर अजूनही नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, काही नागरिक या सर्व नियमांना धाब्यावर बसवून बिनधास्त सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे, अशा नागरिकांनी आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे.